श्री रामदत्तगुरु चरित्र.....Http://ramdattaguru.org
मुख्य पृष्ट श्री रामदत्तगुरु चरित्र आरती नमन अष्टक अनुभव जे जाणति तीर्थयात्रा व अनुभूति कर्दळिबन चित्र दालन पत्र संवाद
Untitled Document

कस्तुरी गंध या विश्वास गणेश गोडबोले संपादीत ग्रंथाची द्वितीय आवृत्ती
कस्तुरी गंध प्रकाशनआज कस्तुरी गंध या ग्रंथाची द्वितीय आवृत्ती आपले हाती देतांना मनस्वी आनंद होत आहे.  प्रथम आवृत्ती डिसेंबर 2008 मधे प्रसिध्द झाल्यावर केवळ 18 महिन्यातच संपली.  हे पुस्तक विदर्भा व्यतिरिक्त पुणे, मुंबई, गोवा, सांगली सह पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा या सर्व भागात पोहोचले.  भक्त मंडळींनी या ग्रंथाचे भरभरुन स्वागत केले.  पू. दत्तमहाराजां संबंधीची माहीती अनेकांना झाली, एक महान आध्यात्मिक, दैविक, शांत व उर्जास्त्रोताने भारलेल्या दत्त भक्ताच्या जीवनाचे यथार्थ दर्शन लोकांना घडविणे हेच या ग्रंथाचे फलीत.
या कालावधीत पू. मायबाईंचे देहावसान झाले हा मोठाच धक्का, पू. महाराजांना व सर्व भक्तमंडळींना बसला, पू. महाराज आता तब्येतीनेही थकले आहेत.  तेव्हा त्यांना कमीत कमी त्रास होईल याची काळजी घेण्याची जबाबदारी आम्हा भक्तांचीच आहे, नाही का?  तसेच त्यांचे प्रकृतीला आराम पडावा म्हणून प्रत्येकानी श्री दत्त प्रभूंजवळ प्रार्थना करावी, आपल्या प्रार्थनेत फार मोठी शक्ति आहे.
या आवृत्तीचे विशेष म्हणजे 1) नवीन फोटो टाकले आहेत 2) ज्या नातूंचे वाडयात पू. महाराज 14 वर्षे होते त्या पू. नातू आईंचे मुखाने माहीती घेतली आहे,  3) पू. महाराजांचे बोटातून व कपाळावर जे उर्जास्त्रोतीचे प्रकटीकरण झाले त्या दैवदुर्लभ ज्योती असलेला पू. महाराजांचा फोटो घेतला आहे, 4) याच बरोबर प्रकांड पंडीत डॉ. रघुनाथराव शुक्ल (पुणे) यांचे या उर्जा ज्योती संबंधी विवेचन स्वतंत्रपणे घेतले आहे.  त्यांनी वेळात वेळ काढून ही शास्त्रोक्त माहिती दिली याबद्दल त्यांचे आम्ही ऋणी आहोत.

हा ग्रंथ श्री आनंद जोशी व मिलिंद जोशी (स्कायलाईन कॉम्प्युटर्स) या बंधुच्या अथक प्रयत्नामुळेच प्रसिध्द करणे शक्य झाले.  हे दोघेही पू. गजानन महाराजांचे भक्त आहेत.  श्रीदत्त प्रभू त्यांची सेवा रुजू करुन घेतील व त्यांचे कल्याण करतीलच.
या आवृत्तीचे देखील भक्तगण स्वागत करतील ही अपेक्षा.

संकलन - संपादन 
विश्वास गणेश गोडबोले

परमपूज्य रामचंद्र नारायण कुलकर्णी म्हणजेच प. पू. रामचंद्र सरस्वती स्वामींचे चरित्र बघितल्यास 'जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती' याचे पूर्ण प्रत्यंतर अनुभवास येते. गेली पन्नास वर्षे दीन दु:खी लोकांना नि:स्वार्थपणे मार्गदर्शन करण्याचे कार्य ते करीत आहेत. काही प्रसंगी आपल्या भक्तांना संरक्षण देण्यासाठी त्यानी आपली शक्ती खर्च केली आहे. भक्तांचे अनुभव वाचल्यावर 'सूक्ष्म रुपसे लिला अद्भूत' केल्याचे लक्षात येते. हजारो लोकांना त्यांचा आधार आहे. लोकसेवेचे कार्य करीत असतांना प्रपंच करावा नेटका' हे श्रीरामदास स्वामींचे वाक्य त्यानी सिध्द केले आहे. पू. एकनाथांप्रमाणे 'संसारी असूनी विरक्त संन्यासी' असे त्यांचे उत्तम जीवन आहे. पूर्वी नोकरी सांभाळून जनसेवा करीत . 30 नोव्हें 1997 रोजी निवृत्त झाल्यापासून दु:खितांना मार्गदर्शन करण्यात पूर्णवेळ सत्कारणी लावतात. असे करतांना तब्येतीकडेही दुर्लक्ष होते. दीनार्त लोकांना आधार देण्याचे असिधाराव्रतच त्यांनी घेतले आहे. जनसेवा करतांना कोणाकडूनही कोणतीच अपेक्षा ठेवली नाही. नेहमीच प्रसिध्दीपासून दूर राहिले. आजचे जग भपकेबाज, जाहिरातबाज लोकांचे आहे. अशा वातावरणात खरोखर अध्यात्म जगणारे, वास्तवतेचे भान असलेले, योग्य मार्गदर्शन करणारे असे पू. रामचंद्र सरस्वती स्वामींचे चरित्र जनतेसमोर यावे अशी तीव्र इच्छा मनात उद्भवली. पण ती पूर्ण होणार कशी? हा मोठाच प्रश्न होता. पुस्तकासाठी पू. महाराजांची परवानगी आवश्यक होती. ती मिळणे फारच अवघड होते. सुदैवाने ती परवानगी मिळाली. मात्र याचे बरेच श्रेय पू.महाराजांचे मोठे बंधू श्री नानासाहेब यांना आहे. त्यांनी या कार्याला आशीर्वाद दिले. दुर्दैवाने ते आज आपल्यात नाहीत. हे पुस्तक पाहून त्यांना निश्चितच खूप आनंद झाला असता.

        सर्वप्रथम केवळ भक्तांच्या अनुभूतींचे लहानसे पुस्तक छापण्याचा विचार होता. पण दत्तप्रभूंची इच्छा वेगळीच होती. त्यांनी प्रेरणा देऊन सद्य स्वरुपातील पुस्तक आमचेकडून करवून घेतले.
या  पुस्तकात  पू. महाराजांचे  चरित्र  थोडक्यात घेतले आहे.पू. महाराजांच्या जीवनातील दृश्य घटनाच आम्ही लिहू शकतो. त्यांचे जीवनातील सूक्ष्मामधील अनंत घटनांची आमचेसारख्या पामरांना पुसटशी
कल्पनाही येत नाही. पू. महाराजांचे चरित्र लिहितांना सौ. मन्दाकिनीताई देशपांडे यानी  लिहिलेल्या  पोथीचा  बराच  उपयोग झाला.  पू. महाराजांना वेळोवेळी  प्रश्न विचारुन  बरीच  माहिती  गोळा   केली.  त्या  आधारेच  हे चरित्र लिहिले आहे.

        पूज्य महाराजांनी रिध्दपूर. गिरनार, द्वारका, सोमनाथ इ. यात्रा केल्या. त्या यात्रांचे सविस्तर वर्णन पू. महाराजांनी स्वत: लिहीले आहे. त्यांना आलेले अनुभव, सूक्ष्म दृष्टिने केलेले अवलोकन स्तिमित करणारे आहे. पू. दत्तप्रभूंचा कृपाप्रसाद, श्रीकृष्णाचे प्रत्यक्ष दर्शन हे सर्व वाचतांना आपलं मन भावविभोर होतं. पू. महाराजांसोबत जे भक्त यात्रेमध्ये सामील होते ते धन्य होत. हरहुन्नरी व गुरुकृपांकित प्रा.मिलींद पांडे यांनी या यात्रा वर्णनाचे संपादन केले आहे. दत्तमहाराज व भक्तमंडळींनी तीन वेळेस कर्दलीवन यात्रा केल्या. त्यापैकी प्रथम व तिसऱ्या यात्रेचे अतिशय रसाळ व सविस्तर वर्णन डॉ. सतीश चापडगावकर यांनी केले आहे.

        या पुस्तकांत पू. महाराजांनी वेळोवेळी भक्तांना जे प्रबोधन केले, 'अमृतकण'चे माध्यमातून भक्तांशी जो संवाद साधला तो साधकांना निश्चितच उपयोगी ठरेल. या प्रकरणात पू. महाराजांनी जप,ध्यान,श्रध्दा, अनुग्रह या व अनेक गोष्टींचे मुद्देसूद विवेचन केले आहे. आपण सर्वच त्या परमेश्वराचे (तेजाचे) अंश आहोत पण याची जाणीव आम्हाला नाही. कारण आमच्या चित्तावर वासनांची पुटे जमा झाली आहेत. ती आम्हाला मुक्त होऊ देत नाहीत. अमृतकणाच्या वर्षावात चित्त शुध्द होउन साधकाला स्वत:ची ओळख पटेल ही खात्री आहे. पू. महाराजांच्या जीवनाची तुलना स्वत: झिजून शीतलता देणाऱ्या चंदनाशी करायची की मन प्रसन्न करणाऱ्या शीतल चांदण्यांशी करायची की हिमालयाच्या उत्तुंग शिखराबरोबर की शुध्द सलीला गंगेबरोबर करायची असा प्रश्न पडतो, ज्योतीष शास्त्राच्या अभ्यासकांना जेव्हा विचारले तेव्हा पत्रिकेतील ग्रहांची स्थिती व त्यांची कारकता त्यांनी स्पष्ट केली- अ) पत्रिकेतील चतुर्थ स्थानात गुरु व केतु आहेत. या स्थानातील गुरु स्पष्ट करतो की उत्तरायुष्यात आध्यात्मिक क्षेत्रात अत्यंत उच्च स्थानावर राहातील. आज हे स्पष्टच झाले आहे आज महाराज गुरुपदावर अधिष्ठित आहेत.
ब) केतु पूर्ण संन्यस्त व विरक्त वृत्ती दर्शवितो. आपले महाराज ग्रहस्थाश्रमी असूनही विरक्त व संन्यस्त आहेत.
क) रोहिणी नक्षत्रातील उच्च स्थानीचा चंद्र प्रगट करतो की महाराजांचे सानिध्यात येणाऱ्याला खूप शंाती मिळते. त्याला चांदण्याच्या शीतलतेचा अनुभव येतो.

ड) पत्रिकेतील भाग्यस्थानातील स्वराशीचा शनि 'संयम' दर्शवितो. पू. महाराज शारीरिक व मानसिक क्लेश कितीही होवोत. त्याची जाणीवही होऊ देत नाहीत व अत्यंत प्रसन्न मुद्रेने लोकांना सामोरे जातात. अशा श्रीदत्तप्रभुकृपांकित पू. महाराजांना शत कोटी प्रणाम !!
marathi
या पुस्तकाच्या प्रकाशनासंबंधी आम्ही पू. महाराजांना शब्द दिला आहे की खर्च वजा जाता जर काही उत्पन्न झाले तर ते सर्व उत्पन्न कारंजा, पीठापुरम् व इतर दत्तसंस्थानांना देणगी रुपाने देण्यात येईल. या पुस्तकाच्या प्रकाशनाचा उद्देश आर्थिक लाभ मिळविणे हा अजिबात नाही तर केवळ गुरुपदी वाड्.मयीन सेवा प्रदान करणे एवढाच आहे.

        हे पुस्तक प्रकाशित, करण्यात अनेकांचे सहकार्य लाभले. त्यापैकी सौ. स्नेहा (मंदाताई) महाजनी, कुसुमताई शिरासाव, सौ.पल्लवी फडके, प्रा. मिलींद पांडे, डॉ. चापडगावकर, प्रविण मुळे, सुदर्शन देशपांडे, प्रा. अनिल बाळापुरे, यांचा विशेष उल्लेख करावा लागेल. आम्ही सर्व एकाच परिवारातील आहोत. सौ.विनीता वि. गोडबोले यांनी हस्तलिखित तयार करण्यापासून ते प्रुफ तपासण्यापर्यंत विविध प्रकारे कामे केली व आपली सेवा गुरुपदी अर्पण केली. मराठीच्या प्राध्यापिका डॉ.सुमती रिसबुड यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. श्री.यशवंत नानोटे (यश कॉम्प्युटर्स) यांनी डी.टी.पी.चे काम चांगल्या प्रकारे केले. श्री. नंदकिशोर बाहेती (श्रीजी प्रिंटर्स) यांनी कमी वेळात व अतिशय सुंदर स्वरुपात पुस्तक तयार केले. चि. राहुल गोडबोले यांनी फार सुंदर मुखपृष्ठ तयार केले. मी या सर्वांचा आभारी आहे.
प.पू. हरिभक्त परायण भाऊमहाराज निटूरकर  व दत्तमहारांचा संबंध पू. महाराज प्रथम जेव्हा कर्दली वनात गेले तेंव्हा आला त्यांचे सोबत             पू. निटूरकर महाराज गेले होते. ही त्यांची पहिली ओळख. गेल्या चार वर्षांच्या  या अल्पकाळातच त्यांचे संबंध दृढ झाले. पूज्य भाऊमहाराज निटूरकर यांनी श्रीपाद श्रीवल्लभांचे चरित्र तेलगू भाषेतून मराठीत अनुवाद करुन दत्तभक्तांचे हाती अमृतकलशच ठेवला आहे. श्री. दत्त प्रभूनी संकेत देउन निटूरकर महाराजांचे कडून हे पुस्तक अनुवादित करुन घेतले आहे.
अशा पूज्य निटूरकर महाराजांना शतकोटी प्रणाम. भाऊमहाराज नोकरी सांभाळून सर्वदूर भागवतसप्ताह प्रवचन करण्यात पूर्णत: व्यस्त असतात. आपल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून त्यांनी श्री महाराजांचे प्रेमाखातर पुस्तकाला अभिप्राय दिला त्याबद्दल त्यांचा मी ऋणी आहे.

        डॉ.रघुनाथराव शुक्ल ज्यांना पाच विषयात डॉक्टरेट मिळाली आहे.  ऊर्जा क्षेत्रात अधिकारी व्यक्ती म्हणून संपूर्ण भारतात व भारताबाहेर ज्यांची ख्याती आहे. NCL सारख्या ख्यातनाम संस्थेत 30 वर्षापेक्षा अधिक काळ वैज्ञानिक म्हणून उच्चपदावर ज्यांनी काम केले आहे. त्यांचा अभिप्राय पुस्तकाला लाभला हे आमचे भाग्य होय. डॉ. शक्ल यांना पू. चांगदेव महाराजांचा आशीर्वाद मिळालेला आहे. त्यांनी हजारो देवळे, मठ व अनेक संतांचा अभ्यास केला आहे. पू. महाराजांवरील प्रेमामुळेच त्यांनी वेळात वेळ काढून अभिप्राय दिला त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे.

        ही वाड्.मयीन सेवा सर्वांच्या पसंतीस येईल व भक्तमंडळीना त्यांच्या आध्यात्माच्या वाटचालीत मार्गदर्शक होईल ही अपेक्षा. या पुस्तकाच्या वाचनाने श्री गुरुपदी भक्तांची निष्ठा अधिक दृढ होईल व सायुज्य मुक्तीचा मार्ग अधिक प्रशस्त होईल हा विश्वास आहे. ही वाड्.मयीन सेवा करताना, पूज्य दत्तमहाराजांनी माझ्या हाती कस्तुरी ठेविली. खरे तर यावर त्यांचाच अधिकार. म्हणून या कस्तुरीचा सुगंध त्यांनाच समर्पित.

 

                                               

 

 

श्री रामदत्तगुरु चरित्र.....Http://ramdattaguru.org